Change is the only constant thing in the life.. कुणी तरी म्हंटले आहे.
मला change हवाय असे म्हणून दर १५ दिवसांनी बाहेर पडायची सवय लागली होती. आणि हे एकदम साखरपुडा-लग्न या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये इतकी अडकून गेले की ४-५ महिने एक सुद्धा ट्रिप झाली नाही.
मग काय मी चातका सारखी संधी ची वाट पाहत होते, आणि आयती संधी चालून आली नवीन जॉब सुरू करण्या आधी मला हक्काचे ४ दिवस मिळणार होते, म्हंटले ४ दिवसात कोणते ठिकाण पाहता येईल? त्यात पण सोलो solo बर का चक्र फिरली, विचार विनिमय झाले, आणि एक नाव लक्षात आले...
हंपी ! मागच्या वर्षी डेंग्यू झाल्यामुळे हंपी ची वारी राहूनच गेली..
बरंच ऐकलं होतं, वाचलं होतं....
इथं एकदा तरी जायलाच हवं,
ह्या ठिकाणी ४ दिवस मनसोक्त जगता येईल, इतिहासाचा वारसा पाहता येईल....निसर्गाची मुक्त उधळण, नदी उन्ह वारा पाऊस यांची एकत्र किमया पाहता येईल.....अगदी झक्कास बेत ठरला..
आमचे काही भटके मित्र आधीच हंपी च्या वाऱ्या करून आलेत त्यामुळे योग्य ती माहिती आयतीच मिळाली त्यात भर म्हणून गूगल बाबा आहेतच....तथास्तु म्हणत त्यांनी जायचं कसे, गेस्ट हाऊस, पहायची ठिकाणं, हवामान, संस्कृती, लोकं etc etc यांची असेल नसेल ती सर्व माहिती दिली.
पण घरी काय सांगणार..?? solo जातेय? अजून तरी आमच्याकडे हा प्रयोग पचनी पडलेला नाही...म्हंटले या solo नादात ट्रिप कॅन्सल नको होयला
मग चाचपणी केली ...जवळच्या मित्र मैत्रिणी कडे...१-२ तयार झाले पण बघू, सांगतो असे करत करत...लास्ट डे ला काय होत ते तुम्हाला पण माहितेय शेवटी ऑफिस मध्ये श्वेता ला प्लॅन सांगितला....गेले ३ वर्षे आम्ही सोबत ट्रेक ला जायचं प्लॅन करतो जो की फ्लॉप च होतो पण अहो चमत्कार यावेळी मॅडम स्वतः म्हणाल्या चल जया मीपण येते... आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे
सगळी बुकिंग, शॉपिंग झाली....बॅगा भरून आम्ही तयार
घर, ऑफिस, रोजची धावपळ या सर्व गोष्टी पासून थोडं लांब जायचा प्रवास सुरू झाला....रात्रीची एसी बस पुणे - बंगलोर हायवे वर सुसाट वेगाने पळत सुटली.
पुणे ते होसपेट - बस होसपेट ते हंपी - ऑटो असा एकूण ९-१० तासांचा प्रवास करत आम्ही गेस्ट हाऊस ला पोहचलो. जरा दमलो खरं पण....
इथल्या ना हवेतच जादू आहे म्हणा ना.! वातावरण पण फुल्ल भारी....ना गरम, ना थंड, ना दमट....
निळेशार ढग, संथ गतीने वाहणारं तुंगभद्रा च पाणी, स्वतःच पाण्यात पडलेले प्रतिबिंब निरखून पाहणारे दगडांचे डोंगर ...गोल गोल फिरणारी बोट, खळखळ आवाज करत मधेच नदीचं बदललेले रूपं.... रोजचा च सूर्यास्त नवीन, रंगांची उधळण करणारा.... आणि तो पाहण्यासाठी आम्ही रोज नवीन टेकाडावर ठाण मांडून बसत असे.. किष्किंधा पर्वतावरून दिसणारे हंपी चे विहंगम दृश्य तर अवर्णनीय..! ट्रेक केल्याचं सार्थक झालं
जिकडे नजर फिरवू तिकडे फक्त निर्मळ आकाश, दगड - डोंगर, नदी, नारळाची झाडं, भाताची खाचरं आणि स्वच्छ नागमोडी रस्ते....अगदी छोटंसं गाव..! माणसं पण अगदी शांत, साधी.... इंग्लिश बोलणारी पण हिंदी न समजणारी.... आम्ही इडली, वडा सांबार, डोसा, उत्तप्पा, अप्पे, भात यावर यथेच्छ ताव मारला.. मँगो ट्री हॉटेलला तर इस्राईल पदार्थ खाण्याचा योग आला...अप्रतिम..!
श्वेता आणि मी मिळून प्रत्येक दिवस नव्याने जगत होतो, रात्री पुस्तकात वाचायचं उद्या कुठं जायचं, रोज नवनवीन ठिकाणं पाहायची, फुल डे धमाल मस्ती...कधी पायी, कधी सायकल तर कधी लुना...सकाळ, दुपार, संध्याकाळ...पायाला भिंगरी..
ना गोंधळ, गोंगाट, वाद, भांडण, रुसवा... ना टेन्शन... फक्त आम्ही दोघी आणि निवांत अशी आमची हंपी मधील भटकंती....! यासाठी मी श्र्वेताची नेहमीच ऋणी राहील तुझ्या मुळे मला हंपी ला जाता आले...आपले मैत्री चे धागे अजून घट्ट झाले.. Thanks dear
सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे सुबक, नक्षीदार, उत्तम कारागिरी केलेली मंदिरं, सभामंडप, गाभारे, रथ, कळस, खांब..आणि विशेष म्हणजे विरूपाक्ष मंदिर सोडले तर एकाही देवळात देवाची मूर्ती किंवा पूजा नाही....हे पाहून मी तर पाहून थक्क झाले... त्या काळात विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून मिरवणाऱ्या हंपी मध्ये काहीच कमी नाही...!
विठ्ठल मंदिर, विरूपाक्ष मंदिर, पुरंधर मंडप, लोटस महाल, पुष्करणी, गणेश मंदिर, मोठा तराजू, जैन मंदिर, हत्ती महाल, सोने चांदी चा बाजार, नवरात्री उत्सव साजरा करायचा चौथरा, राजाची गुप्त सभा भरणारी जागा, सभामंडप, त्या काळातला एसी, अष्टकोनी योगा करायचं ठिकाण, राणी ची आंघोळ करायचं महाल, किष्किंधा पर्वत असे खूप काही आहे पाहायला.... सगळेच अजब आहे..
इथे प्लास्टिक, कचरा, दारू, हॉटेल्स, पार्टीज याला सक्त मनाई आहे. कर्नाटक पर्यटन विभाग, हंपी मधील रहिवासी यांचे खूप आभार...त्यांनी योग्य तो मान राखला आहे युनेस्को हेरिटेज चा..!
इथे देश विदेशातून पर्यटक येतात, १-२ महिने राहतात....हंपी त्यांना आपलेसे करून घेते आणि तेपण इथले च होऊन जगतात.... एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की बरेच जण ३-४ वेळा आलेले होते...काय जादू आहे ना...! आम्हाला पण एका विदेशी मुलीने भुरळ घातली, तिचा भारतीय पेहराव, दागिने घालून सुरू असलेली भटकंती काही निराळी वाटली...एकदा डिनर ला भेटली आणि मग चांगली मैत्री झाली....२८ वर्षाची मुलगी ११ देश एकटी फिरते, भारतात गेले १० महिने एकटी राहतेय...स्वतः ला शोधतेय...जग फिरते आहे...मला तर फारच भारी वाटली ती...! आणि आम्ही अजून पण सोलो ट्रिप चं टेन्शन घेतो....असो...हा वेगळा विषय आहे
एकूणच काय तर पूर्ण हंपी खूपच सुंदर, निर्मळ, निसर्गरम्य, इतिहासाची साक्ष देणारे, आपला वारसा जपणारे, तुम्हाला मला अभिमान वाटावा अशा दिमाखात आज ही उभे आहे...!
हंपी बद्दल मी किती लिहिणार आणि तुम्ही किती वाचणार यापेक्षा तुम्ही स्वतः हंपी ला एकदा तरी भेट द्या असे मी नक्की म्हणेल..!!
हंपी ची दुसरी वारी लवकरच आणि तेही जोडीने करायची हे मनाशी पक्क ठरवूनच, अतिशय प्रसन्न मनाने (change घेऊन) पुण्याला पोहचले..